श्री देवी सातेरी देवस्थान (वेंगुर्ला)
विषयी माहिती :

                                     वेंगुर्ले हे नाव या भागास पडण्यास कारण अशी एक दंतकथा या भागात प्रचलित आहे. त्या कथेचा संबंध थेट श्री देवी सातेरीशी आहे. श्री देवी सातेरी हि मूळ अणसूर या गावची. वेंगुर्लेपासून हे गाव ६ मैल अंतरावर आहे. त्याकाळी सुभ्याचे प्रमुख गाव म्हणून प्रसिद्ध होते. वेंगुर्ले हे शहर त्याकाळी अस्तित्वात नव्हते. अणसूर या गावात श्री देवी सातेरीचे मंदिर आहे. आज त्या मंदिरास मूळ भूमिकेचे मंदिर म्हटले जाते. त्या मंदिराचे परब आणि गावडे हे दोन प्रमुख मानकरी आहेत. त्या काळातील परब कुळातील एक पुरुष (सध्याच्या वेंगुर्लेच्या परब कुळाचा मूळपुरुष) नित्यनेमाने वेंगुर्लेहून ६ मैल चालत अणसूर येथे जाऊन श्री देवीची पूजाअर्चा करत असे.

                 

                                     पुढे वृद्धापकाळाने चालत जाणे अशक्य होऊ लागल्याने त्याने देवीची मनोभावे करून भाकली. श्री देवीच्या दर्शनाची व्याकुळता आणि उत्कट निस्सीम भक्तीमुळे त्या पुण्यपुरुषास एके दिवशी दृष्टांत झाला. देवीने प्रसन्न होऊन सांगितले कि मी तुझ्याजवळ येईन. तुझ्या गाईने ज्या जागी पान्हा सोडलेला असेल त्या जागी मी आहे. त्या दृष्टांताप्रमाणे शोध घेतला असता त्याला गाईने पान्हा सोडलेल्या पाषाणावर मातीचे वारूळ झरझर वाढत आहे असे दृश्य दिसले. ते पाहून त्या पुण्यपुरुषाने अति उत्कट भक्तीभावाने त्या मातीच्या वारुळास मिठी मारली आणि सांगितले ” आई, आता तू येथेच थांब”. आणि त्याचबरोबर त्या वारुळाची वाढ थांबली.

               

                                     मिठी म्हणजे वेंग हा शब्द त्याकाळी प्रचलित होता. वारूळ वेंग मारून उरले यावरूनच वेंग मारून उरले ते वेंगुर्ले, असे या नगरीचे नामकरण झाले. श्री देवी सातेरी वारुळाच्या रूपाने प्रकट झाल्यावर कालांतराने तिला एक आकार देऊन मुखवटा तयार केला गेला. श्री देवी सातेरी मंदिरात असलेल्या मूर्तीखाली ते स्वयंभू पाषाण आहे. दार तीन – चार वर्षांनी मूर्ती बदलून तिची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येते, त्याला मळलेपण कार्यक्रम असे म्हणतात. देवीच्या जागरूकतेची पडताळा आजही लोकांना येतो. नवरात्रीत नारळ, तांदळाची ओटी भरणारा गरीब व सोन्या चांदीच्या वस्तू अर्पण करणारा धनवान दोघेही एकाच भक्तिभावाने देवीसमोर नतमस्तक होताना दिसतात.